मुंबई : मॅगीवर लादण्यात आलेली बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टानं काल दिला. मात्र प्रत्यक्षात मॅगी विक्रीसाठी आणखी सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे. तसेच मॅगीची पुन्हा तपासणी होणार आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे मॅगी उत्पादक नेस्ले इंडियाला मोठा दिलासा मिळालाय. मॅगीमध्ये मोनो सोडीयम ग्लुटामेट आणि शिशाचे प्रमाण निर्धारीत प्रमाणापेक्षा जास्त असल्यानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली होती. या बंदीला आव्हान देणारी याचिका नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र आता ही बंदी उठवण्याचा अंतरिम निकाल कोर्टानं दिलाय.
मॅगीवर बंदी घालताना नेस्ले कंपनीला नैसर्गिक न्याय नाकारण्यात आल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलंय.
२० पैकी केवळ ५ नमुने सदोष आढळले असताना बंदी का घालण्यात आली? त्यातही केवळ २ उत्पादनांमध्ये शिशाचं प्रमाण अधिक आढळलं असेल, तर सर्व ९ उत्पादनांवर बंदी का घालण्यात आली? असे सवालही हायकोर्टानं उपस्थित केलेत. ज्या प्रयोगशाळांमध्ये FSSAIनं तपासणी केली, त्या अधिकृत नसल्याचा मुद्दाही हायकोर्टानं उचलून धरलाय.
दरम्यान, नेस्ले इंडियानं आता पंजाब, हरियाणा आणि जयपूरमधल्या ३ भिन्न प्रयोगशाळांमध्ये ५-५ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवावेत. या प्रयोगशाळांमध्ये मॅगी निर्दोष असल्याचं सिद्ध झालं तर कंपनीला मॅगीचं उत्पादन करायला परवानगी दिली जावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. त्यासाठी सुमारे ६ आठवड्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाचा निकाल येताच शेअर बाजारांमध्ये नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये जोरदार उसळी बघायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात काही मिनिटांत नेस्लेच्या शेअरमध्ये अडीचशे अंशांपेक्षा मोठी वाढ झाली. तर जनतेनंही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात.
मॅगी प्रकरणामुळं नेस्ले कंपनी आणि सरकारलाही धडा मिळालाय. आरोग्याला अपायकारक खाद्यपदार्थांची मनमानी विक्री करता येणार नाही आणि मनमानीपणानं कुठल्याही उत्पादनावर बंदीही घालता येणार नाही, हेच या निकालानं स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.