मुंबई : सर्वेक्षणाचा अहवाल अजून आलेला नाही, तसेच शिवसेनेशी जागा वाटपावरून अजूनही एकमत होत नसल्याने, थेट अंतिम यादीच जाहीर करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. नेमक्या किती जागा लढवायच्या हे सर्वेक्षणातून ठरणार आहे, काही विद्यमान आमदारांनाही तिकीटाशिवाय समाधान मानावं लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
शिवसेनेशी जागावाटपाचा निर्णय रखडल्याने आणि सर्व २८८ मतदारसंघांच्या सर्वेक्षणाचे अहवाल अद्याप न आल्याने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर न करता थेट अंतिम यादीच जाहीर करण्याचे भाजपने ठरविले आहे. किती जागा लढवायच्या याचा अंतिम निर्णय सर्वेक्षणानंतर होणार असून काही विद्यमान आमदारांनाही भाजपकडून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
महायुतीचे जागावाटप १० ऑगस्टपर्यंत होईल, तर भाजपची पहिली उमेदवार यादी १५ ऑगस्टपर्यंत जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र अजून शिवसेनेशी जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. अजून आठवडाभरात तरी हा प्रश्न सुटणार नाही.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपकडे सुमारे २४० संभाव्य उमेदवारांची यादी तयार असून त्यापैकी १०० उमेदवारांची नावे प्रदेश पातळीवर निश्चित करण्यात आली आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणता उमेदवार दिला जाईल आणि जातीचे समीकरण काय राहील, या आधारावर काही मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.