मुंबई : विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जातायत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
कुणी साखर घ्या, कुणी पेट्रोल घ्या. मुंबईतल्या वरळीमध्ये सध्या असे फलक लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे नगारे आता वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांचे इच्छूक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना भुलवण्यासाठी वेगवेगळे फंडे अंमलात आणताहेत.
वरळीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून मैदानात उतरणारे नगरविकास राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मतदारांसाठी 25 रुपये किलो दराने साखर वाटप सुरु केले आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वस्तात साखर देवून मतदारांचे तोंड गोड केलं जातंय.
एकीकडं राष्ट्रवादीनं साखर वाटप केल्यानंतर आता मनसेनंही परिसरातील दुचाकी वाहनधारकांना दहीहंडीनिमित्त मोफत पेट्रोल वाटप करण्याचं ठरवलं आहे. यासाठी वाहनधारकांना शंभर रुपयांचे पेट्रोल कुपन दिली जातायत.
निवडणुकाजवळ आल्या की, मतदारांना भुलविण्यासाठी असे फंडे सर्रास वापरले जातात. मतदारही पाच वर्षातून एकदा येणा-या या संधीचं सोनं करून घेतात आणि मत मात्र ज्याला द्यायला हवं त्यालाच देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.