www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी १८० अंशात यू टर्न घेतलाय. मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही... असं याआधी सांगणाऱ्या मनोहर जोशींनी आता चक्क माफी मागितलीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा इशारा अगदी सुस्पष्ट होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मनोहर जोशी आणि माजी खासदार मोहन रावले यांच्यासारख्या नेत्यांनाच उद्धव यांनी सुनावले होते. या इशाऱ्याचा टायमिंगही अगदी परफेक्ट होता.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मातोश्रीवर झाली. या बैठकीला हजर राहण्यासाठी मनोहर जोशी मातोश्रीवर पोहोचणार, याआधीच हा ‘चले जाव’चा इशारा देण्यात आला. मनोहर जोशींनी प्रकट मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर केलेली टीका आणि त्यानंतर दसरा मेळाव्यात त्याचे उमटलेले पडसाद याबाबत शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बराच खल झाला. अखेर मनोहर जोशी माफीनामा सादर केला आणि ही बैठक संपली.
जोशीसरांनी माफीनामा देताना, वादावर आता तरी पडदा पडू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केलीय.
“शिवसेनेत सर्वाधिक महत्त्व निष्ठेला व शिस्तीला आहे. या निष्ठांचं पालन मी ४५ वर्षे केलं आहे. परंतु बाळासाहेबांच्या स्मारकावरून मी केलेली विधानं वादाच्या भोवऱ्यात सापडली. हे सर्व गैरसमजातून घडले. आजच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मजबूत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. माननीय पक्षप्रमुखांचा अवमान होईल असं कोणतंही विधान माझ्याकडून अनावधानानं जरी झालं असलं तरी पक्षशिस्त म्हणून झाल्या प्रकाराबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दात त्यांनी माफी मागितलीय.
दसरा मेळाव्यात झालेल्या अपमान नाट्यानंतर `मी चूक केली नाही... मी माफी मागणार नाही...`
असा पवित्रा मनोहर जोशींनी घेतला होता. परंतु सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तडजोडीचा पर्याय स्वीकारला असावा, असं वाटतं.
परंतु मनोहर जोशींनी माफीनामा दिला तरी उद्धव ठाकरे यांचा विश्वास ते लगेच संपादन करू शकतील का? दक्षिण मध्य मुंबई नाही, पण निदान ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभेचं तिकीट मनोहरपंतांना मिळणार का? किंवा राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी जोशींच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे मान्यता देणार का? या प्रश्नांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. माफीनामा देणाऱ्या जोशीसरांच्या पदरात यापैकी काहीच पडलं नाही तर `...हाती धुपाटणं आलं` अशीच मनोहरपंतांची अवस्था होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.