www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा कालच्या कार्यक्रमात मनोमिलन केलं. पण इतके वर्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांची माथी भडकवली, उत्तर भारतीयांना मारहाण करून त्यांचे संसार उद्धवस्त केले, हे सर्व गंगेला मिळालं का? असा सवाल करत काँग्रेसने गंगेला काय मिळालं हे राज ठाकरे यांनी स्पष्ट करावं, असा जोरदार टोला लगावला आहे.
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काल एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन तब्बल पाच वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा एकदा मनोमिलन केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी राज यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
काय म्हणाले होते राज ठाकरे
अमिताभ बच्चन यांच्यावर स्तुतिसुमने वाहताना राज म्हणाले की, ‘अमिताभ साहेबांसारखा मोठा अभिनेता झाला नाही आणि होणारही नाही… भाषेवरती कमांड कशी असावी, हे अमिताभजींकडून शिकावं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ यांची स्तुती केली.
‘अमिताभ बच्चन भारताचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर… ते कोणत्याही एका राज्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होऊ शकत नाही’ असं म्हणत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा दाखवून दिलं. ‘अमिताभजी, लताजी ही देवानं पाठवलेली माणसं...’ असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
आपल्या भाषणाचा शेवट करताना अखेर राज ठाकरे यांन आपल्या आणि बच्चन कुटुंबीयांत निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलंच... ‘झालं गेलं गंगेला मिळालं… आणि ती गंगादेखील उत्तरप्रदेशातून वाहते... आम्ही जेवढं प्रेम गंगेवर करतो, तेवढंच प्रेम आम्ही अमिताभजींवरदेखील करतो’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभजींशी आपलं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं दाखवून दिलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.