मुंबई : पश्चिम रेल्वेचे दररोजचे उत्पन्नही १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ एवढे आहे. यात बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात.
बोरीवलीचे दररोजचे उत्पन्न १६ लाख ८६ हजार ५९१ असून अंधेरी स्थानकाचे उत्पन्न हे १४ लाख ८८ हजार ८४५ रुपये एवढे आहे.
यानंतर नालासोपारा १३ लाख ५२ हजार ५८७, विरार स्थानकाचे १३ लाख ३३ हजार ७३३ आणि भार्इंदर स्थानकाचे ९ लाख ९५ हजार १२१ रुपये एवढे आहे. ही माहीती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून माहिती अधिकारातून मिळवली आहे.
चर्चगेट ते डहाणूपर्यंत ३६ स्थानके आहेत. या सर्व स्थानकातून दिवसाला ३५ लाख ८ हजार ४६९ प्रवासी प्रवास करतात. यात एकट्या बोरीवली स्थानकातून २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करत आहेत.
बोरिवलीनंतर अंधेरी स्थानकाचा नंबर लागत असून या स्थानकातून २ लाख ५६ हजार ७७१, नालासोपारा स्थानकातून २ लाख २ हजार ९0३, विरार स्थानकातून १ लाख ८३ हजार ४५६, भार्इंदर स्थानकातून १ लाख ७६ हजार ८४४ प्रवासी प्रवास करतात. वैतरणा, वनगाव आणि केळवे रोड स्थानक सर्वात कमी गर्दीची स्थानके ठरल्याची माहीतीही समोर आली आहे.