www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
माटुंगामधल्या डॉन बॉस्को शाळेला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. हा गैरप्रकार तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच शिक्षण अधिकाऱ्यांकडून डॉन बॉस्को शाळेत चौकशीही करण्यात येतेय.
या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पालकांना बोलावलं जात होतं. शिक्षक पालिकेच्या प्रशिक्षणाला जात असल्याची सबब देत शाळा पालकांनाच वर्गावर लावत असल्याची बाब उघड झाली होती. झी मीडियानं हा धक्कादायक प्रकार समोर आणला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.
शाळेत पालक शिकवत असल्याची कबुली डॉन बॉस्को शाळेनं दिली. शाळेचे शिक्षक मुंबई महापालिकेच्या प्रशिक्षणासाठी जात असल्यानं पालकांना शिकवण्यासाठी बोलवावं लागतं, असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. मनविसेनेनं याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. शिक्षण विभागानं याविरोधात कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.