दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची झालीय. गेल्या 15 वर्षांपासून सरकारी बंगल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या, या माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्यात.

Updated: Oct 23, 2014, 10:31 PM IST
दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’! title=

मुंबई : ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची झालीय. गेल्या 15 वर्षांपासून सरकारी बंगल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या, या माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्यात.
 
मलबार हिलवरच्या या आलिशान रामटेक बंगल्यात गेल्या 15 वर्षांपासून छगन भुजबळ मुक्काम ठोकून होते. मात्र सामान्य प्रशासन विभागानं बंगले खाली करण्याची नोटीस दिल्यानं, दिवाळीच्या दिवशीच त्यांनी सामान हलवायला सुरूवात केली. अगदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही तीच वेळ आलीय. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सर्वच चित्र बदलतं. माजी झालेल्या मंत्र्यांना प्रशासकीय पातळीवर किंमत राहत नाही. तेच चित्र सध्या राज्यात दिसतंय.

19 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 22 तारखेपर्यंत मंत्र्यांनी शासकीय बंगले रिक्त करावेत, अशी नोटीस सामान्य प्रशासन विभागाने बजावली आहे. ही नोटीस आल्यानंतर बहुतांश माजी मंत्र्यांनी आपले बंगले रिक्त केलेत तर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे करण्यासाठी मुदतवाढ मागितलीय. काही जणांनी या नोटीशीला उत्तरंही दिलं नाही. दिवाळीनिमित्त बहुतांश माजी मंत्री आपापल्या गावी आहेत. त्यामुळं दिवाळीनंतर या माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करून द्यावे लागतील. 

पुढील आठवड्यातच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यामुळं माजी मंत्र्यांनी बंगले रिक्त केल्यानंतर या बंगल्यांची रंगरंगोटी अथवा इतर कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. त्यासाठी हे बंगले लवकरात लवकर रिक्त व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.