www.24taas.com, मुंबई
सरकारी दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे एक डॉक्टर गेल्या महिनाभरापासून गायब आहेत. गजनी सिनेमात आमिरनं साकारलेल्या भूमिकेसारखा या डॉक्टरांना विसरण्याचा आजार आहे. आता मॉरिशस कौन्सलेट आणि मुंबई पोलीस या डॉक्टरांना शोधण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.
गजनी मधल्या आमिर खाननं केलेल्या संजय सिंघानियाच्या भूमिकेशी मिळती जुळती ही गोष्ट... मॉरीशसहून मुंबईत आलेल्या डॉक्टर विवेकानंद कुंजा यांची... ५५ वर्षांच्या या डॉक्टरांना विसरण्याचा आजार आहे. मॉरीशसहून मुंबईत आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून ते बेपत्ता आहेत. डॉक्टर विवेकानंद कुंजा दिल्लीमार्गे मॉरीशसला जाण्यासाठी मुंबईला आले होते. पण, विसरण्याचा आजार असल्यानं तीन वेळा त्यांचं विमान चुकलंय.
डॉक्टर कुंजा अंधेरीत एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते त्यांचं सामानही हॉटेलमध्येच विसरुन गेलेत. डॉक्टर विवेकानंद कुंजा यांना शेवटचं एका रिक्षाचालकानं पाहिलं होतं. रिक्षा सोडल्यावर त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी रिक्षा चालकाला स्वतःचा मोबाईल देऊन टाकला. मुंबई पोलिसांना एअरपोर्टवरच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन डॉक्टर कुंजा यांचे काही फोटो मिळाले आहेत. त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. पण अजून त्यांचा शोध लागलेला नाही.