मुंबई: आदर्श घोटाळ्यामुळं गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं चव्हाण यांना आदर्श घोटाळा महागात पडण्याची चिन्हं आहेत.
आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून अशोक चव्हाण यांचं नाव वगळावं अशी याचिका सीबीआयनं मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन राज्यपालांनी चव्हाण यांची चौकशी करण्यास नकार दिल्यानं आरोपपत्रातून चव्हाणांचं नाव वगळावं अशी सीबीआयची भूमिका होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टानं आरोपपत्रातून चव्हाण यांचं नाव वगळण्यात नकार दिला.
मुंबईतील कुलाबा इथं कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लाटल्याचं उघड झालं होतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला आणि त्यामुळंच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.