मुंबई : भारतीय बनावटीचं पहिले विमान महाराष्ट्रात तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमोल यादवांच्या पहिल्या विमाननिर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा खास पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती झी 24 तासला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय बनावटीचे विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'मेक इन इंडिया'मध्ये भारतीय बनावटीचे आपले विमान सादर करणाऱ्या अमोल यादव यांचे हे कार्य आणि त्यामागचे कष्ट झी मीडियाने समोर आणले होते.
झी मीडियाने प्रसारीत केलेल्या अमोल यादवच्या संघर्षाची आणि संशोधनाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांच्याशी संपर्क केला. एवढेच नव्हे तर यादव यांना सरकारने पालघर इथे 19 आसनी विमाननिर्मितीसाठी 147 एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी अमोल यादव यांना सर्व सहकार्य केलं जाईल आणि सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिली, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी झी मीडियाशी बोलताना दिली आहे.