मुंबई : देशात ५०० आणि १०००च्या नोटांवर आणलेल्या बंदीमुळे एका नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली. मात्र त्याचबरोबर सरकारी रुग्णालयात या नोटा स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होत मात्र त्यानंतरही अनेक रुग्णालयांमध्ये ५००, १०००च्या नोटा घेतल्या जात नाहीयेत. याचाच फटका कारपेंटरचे काम करणे जगदीश शर्मा यांना बसला.
जगदीश शर्मा यांची गरोदर बायकोची ट्रीटमेंट गोवंडीतील जीवन ज्योत हॉस्पिटल अँड नर्सिंग होममधील डॉ. शीतम कामत यांच्याकडे सुरु होती. त्यांना ७ डिसेंबरही डिलीव्हरी डेट देण्यात आली होती. मात्र ९ नोव्हेंबरला त्यांच्या पोटात कळा सुरु झाल्या आणि त्यांनी बाळाला जन्म दिला.
बाळ आणि आईची तब्येत नाजूक असल्याने त्यांना या नर्सिंग होममध्ये आणण्यात आले. मात्र सुरुवातीचे उपचार केल्यानंतर भर्ती करुन घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला कारण जगदीश यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ६००० रुपये जमा करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ ५०० रुपयांच्या नोटा होत्या. बँक आणि एटीएम बंद असल्याने ते नोटाही बदलू शकले नाहीत.
यावेळी जगदीश यांच्या घरच्यांनी वारंवार डॉक्टरांना विनंती केली. मात्र त्यानंतरही डॉक्टर बधले नाहीत. अखेर जगदीश यांच्या बायकोला आणि मुलाला घरी सोडण्यात आले. शुक्रवारी मुलाची तब्ब्येत अधिकच बिघडल्याने त्याला चेंबुरमधील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिलेय.