www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सत्कार चक्क गुन्हेगारीचा आरोप असलेल्या आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणातील फरार सट्टेबाजाने केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या आरोपीला पोलिसांनी अटक करून वादावर पडदा टाकल्याचे वृत्त आहे.
कुर्ला येथे गेल्या आठवड्यात गृहमंत्री आर.आर. यांचा सत्कार केल्याचा प्रकार समोर आलाय. आर आर यांचा सत्कार एका गुन्हेगाराच्या हस्ते झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी त्या सट्टेबाजाला अटक करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ३ ऑक्टोंबर रोजी कुर्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दलित-मुस्लिम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला गृहमंत्री आर.आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतेंद्र आव्हाड, अजित पवार आदी दिग्गज नेते उपस्थित होते. या मेळाव्यात अमित पोपट हा सट्टेबाजही उपस्थित होता. पोपट हा आयपीएल बेटिंग प्रकरणातील आरोपी आहे.
या सट्टेबाजावर मुंबई पोलीस अनेक दिवसांपासून मागावर होते. दोन आठवड्यांपूर्वी कोर्टाने पोपटचा जामीन अर्ज फेटाळत त्याला फरार घोषीत केले. दलित-मुस्लिम मेळाव्यात पोपटने चक्क व्यासपीठावर जाऊन गृहमंत्र्यांचा सत्कार केला. या सत्काराचे छायाचित्रही काढून घेतले, असे वृत्तात म्हटले आहे.
फरार गुन्हेगार कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही बेधडकपणे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वावरत होता. या मेळाव्याचा आयोजक पोपट होता असे या वृत्तात म्हटले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सावध भूमिका घेत या मेळाव्याचे आयोजन कोणी केले होते याची मला माहिती नव्हती. पोपटशी माझा काहीही संबंध नाही. पोपटला पकडण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासात आदेशानंतर पोपटला अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.