मुंबई : हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबईतल्या कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जामीन नाकारला. त्यामुळे जान्हवीला आता कोठडीतच रहावं लागणार आहे.
दरम्यान या निर्णया विरोधात जान्हवीचे वकील वरच्या न्यायालयात दाद मागणार आहेत. आठ जूनच्या रात्री भरधाव वेगातल्या जान्हवी गडकरच्या गाडीनं इस्टर्न फ्रीवेवर, एका टॅक्सीला जोरदार धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जान्हवी मद्यधुंद अवस्थेत होती. तसंच अपघातानंतर घेतलेल्या वैद्यकीय चाचणीत, जान्हवीच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल आढळून आलं होतं.
गडकर हिला जामीन दिल्यास त्याचा खटल्यावर विपरित परिणाम होईल. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. अमित देसाई यांनी गडकर हिची बाजू मांडताना ती साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, तसेच फरारही होणार नाही, असे न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळण्याचा निर्णय घेतला.
नशेत ऑडी गाडी चालविणाऱ्या जान्हवी गडकरने ८ जून रोजी पूर्व मुक्त मार्गावर चुकीच्या मार्गिकेतून गाडी नेली आणि एका टॅक्सीला धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना सादर केलेल्या अहवालात जान्हवीने निर्धारित प्रमाणापेक्षा चौपट मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. जान्हवीच्या रक्तात हेच प्रमाण १२० मिलीग्रॅम एवढे आढळले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.