www.24taas.com, मुंबई
प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
काटजू हे माजी न्यायमूर्ती आहे, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, परंतु, त्यांनी भूमीपूत्रांबाबत जे वक्तव्य केले आहे, ते एखाद्या मेंटल माणसासारखं केलं आहे. त्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात यावे.
भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी भारताचे भाषावार प्रांत रचना झाली. ही प्रांत रचना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. हे त्यावेळी बोलायला पाहिजे होते. भूमीपूत्र ही संकल्पना आहे आणि राहणार त्याला काटजूंच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
मराठी जनताही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केलंय. त्यामुळे आता मराठीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
भूमीपूत्र ही संकल्पना राष्ट्रविरोधी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात मराठी माणसंही परप्रांतीयच आहेत. तेथील भिल्ल तेवढे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे हाकलायची वेळ आल्यास मराठी माणसांनाही महाराष्ट्रातून हाकलून द्यावं लागेल, असं काटजूंचं म्हणणं आहे. त्यामुळे भूमिपुत्र ही संकल्पना राष्ट्रद्रोही असून या मुद्यांचं राजकारण करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, असं काटजूंनी म्हटलं आहे.
काटजूंनी नसत्या भानगडीत पडू नये – संजय राऊत
यापूर्वीही काटजूंनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना देशद्रोही संबोधत अशा गद्दार लोकांना जेलमध्ये टाका असं भाषणात म्हटलं होतंय. तर काटजू यांनी नसत्या भानगडीत पडू नये असा इशारा शिवसेनेनं दिला.