मुंबई : विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी हायकमांडची भेट घेतल्याची माहिती मिळतेय.
येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय़ होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. नारायण राणे यांनी ही निवडणूक लढण्याबाबत अद्याप आपल्याकडे प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
राणे यासंदर्भात पक्षाच्या हायकमांडला भेटल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचंही चव्हाण म्हणाले. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढली आहे. मुंबई महापालिकेतल्या दोन जागांसाठी भाजपाही मैदानात उतरणार असल्याची माहीती मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यानी दिली.
भाजपने या निवडणुकीच उडी घेतल्याने काँग्रेस-भाजपामध्ये चुरस वाढली आहे. मुंबई महापालिका विधान परिषद निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय. यासाठी महाराष्ट्र प्रदेश समिती लवकरच उमेदवार निश्चित करेल, असंही ते म्हणाले.
२७ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या ८ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या २ जागा आहेत. यातली एक जागा शिवसेना सहज जिंकेल. मात्र दुसऱ्या जागासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.