मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.
या बैठकीमध्ये दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या दोन मेट्रो मार्गांना मंजूरी देण्यात आली आणि त्याचबरोबर वांद्रे-कुर्ला जंक्शनवर दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मात्र या निर्णयाला राज्यमंत्रिमंडळाची परवानगी असणं गरजेच आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतरच या प्रकल्पाला सुरूवात होणार आहे.
असा असेल मेट्रोचा मार्ग
दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या 40 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर 36 स्थानके असतील व हा मार्ग पूर्णत: भुयारी असेल.
32 किलोमीटर लांबीच्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या मेट्रो मार्गावर 24 स्थानके भुयारी असतील तर 6 उन्नत असतील.
या दोन्ही मार्गाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल महामंडळाद्वारे येत्या 6-7 वर्षांत करण्यात येणार आहे. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी येणारा अंदाजीत खर्च 25 हजार कोटी रूपये इतका आहे.
तर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या मेट्रो मार्गाचा अंदाजीत खर्च 19 हजार कोटी रूपये इतका आहे.
या दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 50 टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने घेतली जाणार आहे.
उर्वरीत 50 टक्के खर्च केंद्र आणि राज्य शासन किंवा प्राधिकरणातर्फे करण्यात येण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.