www.24taas.com, मुंबई
एकीकडे युवक काँग्रेसच्या पदयात्रेवर टीका करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसनंही दुष्काळाच्या निमित्तानं प्रसिद्धी लाटण्याची संधी सोडलेली नाही. दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.
दुष्काळग्रस्तांना मदत करावी, हे आवाहन करण्यासाठी ही पुस्तिका छापण्यात आलीय. मात्र ही छायाचित्र पाहिल्यानंतर ही राज्यातली नसून अफ्रिकी देशातली असल्याचं लगचेच स्पष्ट होतय. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस दुष्काळग्रस्त मदत अभियानाबाबत किती गंभीर आहे, हेच दिसून येतय. एवढचं नाही तर दुष्काळग्रस्त भागातली म्हणून ज्या जनावरांची छायाचित्र या पुस्तिकेत छापण्यात आलीयेत, तशी जनावरं महाराष्ट्रात नाही तर हॉलंड आणि न्यूझीलंडमध्ये आढळत असल्याचं तज्ज्ञ सांगतायेत. या छायाचित्रांवरुन विरोधकांनी राष्ट्रवादीला कोंडीत गाठण्याची संधी सोडलेली नाही.
दुसरीकडे दुष्काळग्रस्तांसाठी छापण्यात आलेल्या या छायाचित्रांबाबत आता राष्ट्रवादीकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु. यापुढे असं घडणार नाही, असा बचावात्मक पवित्रा आता प्रवक्त्यांनी घेतलाय. ऐन दुष्काळात राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधवांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं विरोधकांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. आता पुन्हा चुकीचे फोटो वापरल्यामुळं विरोधकांच्या हातात नव्यानं आयतं कोलीत मिळालंय.