www.24taas.com, मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी एकाच दिवशी ठाकरे बंधुंबरोबर वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र आले होते... यानिमित्तानं राजकीय वर्तुळाच बरीच चर्चा रंगतेय. राज – उद्धवच्या एकीसाठी गडकरी ‘पूल’ ठरतायत की काय? असाही प्रश्न अनेकांना पडलाय.
शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दुपारी राज ठाकरे आणि नितीन गडकरी एका मंचावर होते तर संध्याकाळी मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दिसले. नाशिकमध्ये मनसेची भाजपबरोबर युती आहे तर मुंबईत भविष्यात युतीमध्ये मनसेचाही समावेश करायचा भाजपचा प्रयत्न आहे. अजून तरी शिवसेनेचा याला विरोध होतोय... पण, राजकारणात भविष्यातील निर्णयांबाबत काढलेले कोणते निष्कर्ष कधी बरोबर ठरतील आणि कधी चुकीचे हे सांगता येणं जरा कठिणच!
ठाकरे बंधुंबरोबर वेगवेगळ्या व्यासपीठावर दिसणारे गडकरी भविष्यात दोन्ही बंधुंना राजकारणात एकत्र आणणारे पुलकरी ठरतील का, अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झालीय.