मुंबई : सोन्यापेक्षाही कांद्याला सध्या भलतीच मागणी आली आहे... त्यामुळेच की काय आता चक्क कांद्याचीच चोरी होऊ लागली आहे.
मुंबईतल्या प्रतिक्षानगर भागातून चक्क कांद्याची चोरी झाली आहे. तब्बल ७०० किलो कांदा चोरण्यात आला आहे. त्या कांद्याच्या चौदा गोण्या होत्या. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आनंद नाईक नावाच्या व्यापाऱ्यानं ही तक्रार दाखल केलीय.
कांद्याच्या दरानं गाठला नवा उच्चांक
लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला ६३२६ रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय. २०१३ साली भाव ६२९९ रूपयांपर्यंत पोहोचला होता.
आजमितीस सरासरी भाव ५७०० रुपये तर किमान भाव ३२०० रुपये प्रति क्विंटल आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत.
तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. साठेबाजीच्या संशयावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी गोदामांवर ही कारवाई करण्यात आलीय. भाव प्रति क्विंटल ६००० वर गेल्यानं शासनदरबारी खळबळ माजली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.