पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?

पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे.   

Updated: Apr 7, 2016, 08:32 PM IST
पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ? title=

मुंबई: पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. 

या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परप्रांतीय रिक्षा चालकांना देण्यात येणाऱ्या परमिटवरून राज ठाकरेंनी आपल्या मागच्या सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या नव्या रिक्षा जाळा, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. 

त्यानंतर आता राज ठाकरे शिवाजी पार्कवर सभा घेत आहेत. ही सभा मनसेच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी निर्णायक मानली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे सपशेल अपयशी ठरली. लोकसभेत मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही. तर विधानसभेमध्ये 13 आमदार असलेल्या मनसेचा 2014च्या निवडणुकांमध्ये फक्त एकच आमदार निवडून आला. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या स्थितीत पक्षाला नवी उभारी द्यायला राज ठाकरे मैदानात उतरत आहेत.