मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला 1,93,784 रुपयांचा दंड भरावा लागला आहे. आपला बंगला मन्नतच्या बाहेर बेकायदेशीररित्या रॅम्पचं बांधकाम केल्यामुळे बीएमसीनं शाहरुखकडून हा दंड वसूल केला आहे. माहितीच्या अधिकारामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बीएमसीकडे ही माहिती मागितली होती.
आपली व्हॅनिटी व्हॅन पार्क करण्यासाठी शाहरुखनं बंगल्याबाहेर रॅम्प बांधला होता. पण तिथल्या स्थानिकांनी शाहरुखच्या या रॅम्पला विरोध केला. यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी शाहरुखला 6 फेब्रुवारी 2015 ला नोटिस पाठवली.
ही नोटिस पाठवल्यानंतर 15 फेब्रुवारीला बीएमसीनं हे बेकायदेशीर बांधकाम पाडायला सुरुवात केली. हे बांधकाम पाडल्यानंतर महापालिकेनं शाहरुखला दंड म्हणून 1,93,784 रुपये दंडाची नोटीस पाठवली, शाहरुखनंही बीएमसीला चेक देऊन हा दंड दिला, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी दिली आहे.