शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत. कारण यूपीए सरकारबाबतची आक्षेपार्ह प्रकरणं मराठी आत्मचरित्रात आहेत. मात्र इंग्रजी आत्मचरित्रातून ती नेमकी गायब आहेत. याची काय कारणं असावीत.

Updated: Dec 17, 2015, 09:18 PM IST
शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत. कारण यूपीए सरकारबाबतची आक्षेपार्ह प्रकरणं मराठी आत्मचरित्रात आहेत. मात्र इंग्रजी आत्मचरित्रातून ती नेमकी गायब आहेत. याची काय कारणं असावीत.

शरद पवारांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला दिल्लीत सगळे जानेमाने, वजनदार राजकीय नेते एकाच व्यासपीठावर जमले होते. सत्ताधारी आणि विरोधकही. दोघांनाही एकत्र आणण्याची किमया साधली ती शरद पवारांनी.

याच कार्यक्रमात त्यांचं 'ऑन माय टर्मस्' हे इंग्रजी तर 'लोक माझे सांगाती' हे मराठी आत्मचरित्र प्रकाशित झालं. ही दोन्ही आत्मचरित्र पवारांचीच. त्यामुळं ती सारखीच असतील, असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. 

कारण ते पवार आहेत. यूपीए सरकारच्या कारभारावर तिखट भाष्य करणारी दोन प्रकरणं त्यांच्या मराठी आत्मचरित्रात आहेत. संपुआ आकारताना आणि संपुआचं दशक.

सरकारमध्ये एकाहून अधिक सत्ताकेंद्र झाल्यानं निर्णय प्रक्रियेचे गोंधळ सुरू झाले. राजकीय संकटांचा सामना करण्यासाठी आघाडीच्या राजकारणात समन्वय समितीचं महत्त्व कमी करण्याची काँग्रेसची घोडचूक, पंतप्रधानांचं मौन, नोकरशाही आरोपीच्या पिंजऱ्यात, घटक पक्षांना विश्वासात न घेणं यातून सरकारच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला. 

 

 

 

मनोबल हरवलेल्या सरकारमध्ये निर्णय भिजत पडू लागले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रीय सल्लागार परिषद आता निर्णय प्रक्रियेत अधिकच वर्चस्व गाजवू लागली. अशा असाधारण हस्तक्षेपामुळे 'पंतप्रधान' या संस्थेचं अवमूल्यन झालं, अशा परखड शब्दांत पवारांनी यूपीएची चिरफाड केलीय.

माझ्या मंत्रालयात कुणाचा हस्तक्षेप नसला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण केलं गेलं होतं, त्याबद्दल मी नाराज होतो. या साऱ्याचा मला प्रचंड उद्वेग आला होता. 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या विद्वतेबद्दल आदर बाळगूनही सरकारच्या प्रमुखानं देशहिताच्या दृष्टीनं अधिक कणखर भूमिका घ्यायला हवी होती, अशा शब्दांत पवारांनी मनमोहन सिंग यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्रात यूपीए संबंधित ही दोन्ही प्रकरणं चक्क गायब आहेत. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजी आत्मचरित्रातही ही दोन प्रकरणं होती. मात्र ती काढून टाकण्याचा निर्णय कुणी आणि का घेतला, हे आता नवं राजकीय कोडं बनलंय.