मुंबई : नाल्यावरील ब्रीज तोडण्यावरुन डोंबिवलीतल्या सागर्ली इथं राडा झालाय. कारवाईसाठी गेलेल्या एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडलाय. या गावात मंगळवारी सकाळपासूनच अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु होती. यावेळी सागर्ली गावात नाल्यावर असणारा पूल तोडण्यास एमआयडीसीकडून सुरुवात करण्यात आलीय.
ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषदे मार्फत हा पूल बांधण्यात आल्याचं सांगत स्थानिक भाजप नगरसेवक महेश पाटील आणि ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. प्रकरण वाढत असल्यानं पोलिसांना लाठीमार करावा लागला.
संतप्त जमावानंही दगडफेक करत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक एमआयडीसी अधिकारी आणि एक पोलीस जखमी झालेत. या दगडफेकप्रकरणी महेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.