मुंबई : युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी की नेतृत्व उभे करण्यासाठी असा टोला तावडेंनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना आता मैदानात उतली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'केजी टू पीजी' पर्यंतच्या विविध प्रश्नांवर महा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईत गिरगाव चौपाटीहून हा मोर्चा निघेल. या मोर्चात सहभागी विद्यार्थी - पालक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील गोंधळाचा पाढा आदित्य ठाकरे वाचून दाखवणार आहेत.
शिक्षण मंत्री विनोद तावडे युवा सेनेच्या मागण्यांची दखल घेत नसल्यानं शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली जाणार आहे. विशेष म्हणजे सत्तेत शामिल असून सरकार विरोधी भव्य मोर्चा शिवसेनेकडून काढला जात असल्यानं सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.