मुंबई : मृतदेहाजवळ सापडलेल्या एका तिकीटावरुन पोलिसांनी चक्क १० दिवसांत खुन्याचा शोध घेतलाय. वाळीव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावलाय. २१ जानेवारी रोजी सुसाई रोड घोडबंदर येथे एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. या अनोळख्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे केवळ एक तिकीट होते. या तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
या एका तिकीटावरुन पोलिसांनी तपासास सुरुवात केली. मुंबई सेंट्रल ते नालासोपारा प्रवासाचे ते तिकीट होते. यादरम्यान या तरुणाशी संबंधित हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे की नाही हे तपासले. तसेच मुंबई सेंट्रल स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजही तपासले. याच तपासादरम्यान त्यांना या प्रकरणासंबंधित पहिला धागा सापडला. या तरुणाच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरुन त्या तरुणाची ओळख पटली. त्याचे नाव होते मशूक अली आणि तो वांद्रेतील खेरवाडी येथे राहणारा होता.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मशूकच्या वडिलांना कळवले. मशूक आणि त्याचे वडील प्रोफेशनल मसाजर होते. जेव्हा पोलिसांनी मशूकच्या वडिलांना सीसीटीव्ही फूटेज दाखवले त्यावेळी सीसीटीव्हीत मशूकसोबत जावेद मारेडिया असल्याचे वडिलांनी पाहिले. जावेद हा मशूकचा मित्र होता.
त्यानंतर ३० जानेवारी रोजी पोलिसांनी जावेदला अटक केली आणि खुनाचा अखेर उलगडा झाला. ३० वर्षीय जावेद स्वीट शॉपमध्ये कामाला होता. मशूकच्या आक्षेपार्ह फोटोवरुन जावेद त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. यातूनच त्याने मशूकची हत्या केली.
३० जानेवारी रोजी जावेदला अटक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाणे कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.