व्यापारी संकुलासाठी शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट

उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2013, 07:06 PM IST

www.24taas.com,चंद्रपूर
उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.
जागेचे भाव गगनाला भिडलेत. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये तर भूखंडाचे श्रीखंड लाटल्याचे प्रकार घडलेत. आता हाच प्रकार चंद्रपुरातही घडतोय... इथं तर चक्क जिल्हा परिषदने शाळांच्या १०० कोटींच्या भूखंडावर डोळा ठेवल्याचा आरोप होतोय... जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 5 भूखंडांवर व्यापारी संकुलं उभारण्याचा प्रस्ताव आम सभेत ठेवण्यात आलाय.
या ५ भूखंडांपैकी ३ जागांवर प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.. मात्र यामुळं पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

दुसरीकडे शाळा तोडून व्यापारी संकुलं बांधणार नसल्याचं जिल्हा परिषदने स्पष्ट केलंय. मात्र हा केवळ प्रस्ताव असून दोन्ही बाजूंच्या सूचना आणि आक्षेपांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं जिल्हा परिषदेनं सांगितलंय.
एकीकडं सर्वशिक्षा अभियानासारख्या योजना सुरु करुन शैक्षणिक विकासाच्या नावानं राजकीय नेते गळे फोडतात.मात्र झेडपीतील सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादीसह विरोधक काँग्रेसही या मुद्यावर मूळ गिळून गप्प बसलेत. हे भूखंड सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनलेत, अशी चर्चा आता झडत आहे.