www.24taas.com , झी मीडिया, अमरावती
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.
अमरावती जिल्ह्यातल्या कुर्हाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वीरगव्हाण गावात ही धक्कादायक घटना घडलीय. २५ वर्षीय सीमा (काल्पनिक नाव) रिसोड इथल्या मोठेगावची राहणारी. सीमा अमरावती विद्यापीठामध्ये कंत्राटदार गजानन जाधव यांच्याकडं मुलींच्या वसतिगृहातील भोजन कक्षात काम करीत होती. तिथं वीरगव्हाण आणि कारला इथल्या काही महिला कामावर होत्या. तिथंच काम करणारी महिला लक्ष्मी (काल्पनिक नाव) हिनं सीमाला विवाह करण्यासाठी एक मुलगा सुचविला.
चांगला मुलगा असल्यास विवाह करण्यासाठी सीमानं होकार दिला. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी वीरगव्हाण इथला रहिवासी विनय बकाराम मेश्राम (४५) आणि त्याची आई बयनाबाई (६५) हे दोघं सीमाला भेटण्यासाठी विद्यापीठात आले. त्यांनी सीमाला घर पाहण्याच्या बहाण्यानं घरी नेलं. परंतु त्यानंतर त्यांनी तिला परत न पाठविता तीन वर्षे घरात डांबून ठेवलं. बळजबरीने विनयसोबत घरगुती विवाह लावला.
मेश्राम कुटुंबातील सदस्य सीमा ही त्यांची भाची असल्याचं परिसरातील नागरिकांना सांगायचे. सीमाला घरामध्ये डांबून तिच्यावर मेश्राम कुटुंबातील सदस्य अत्याचार करीत असल्याची तक्रार विनयच्या पहिल्या पत्नीनं २७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केली. तक्रार मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सहा. पोलीस निरीक्षक मुकेश गावंडे, एएसआय संजय राठोड, हेड कॉन्टेबल अरुण मेठे, संजय काळे, संजय प्रधान, शकील चव्हाण, ममता अंबुलकर, सोनाली जवंजाळ यांनी वीरगव्हाण गावात जाऊन राखीची सुटका केली.
या प्रकरणी कुर्हाक पोलिसांनी आरोपी विनय मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविलाय. सीमाच्या सहमतीनं पोलिसांनी तिला विद्यापीठातील कंत्राटदार गजानन जाधव यांच्या सुपूर्द केलं. विनय फरार असून या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. तर विनयची आई बयनाबाई आणि मोठा भाऊ पंडित यांनासुद्धा आरोपी बनविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.