www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
तेलंगणा राज्याच्या निर्मिती प्रक्रियेला वेग मिळाला असतानाच आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर पकडलाय.. आज नागपूरच्या टेम्पल रोड परिसरात भाजप, शेतकरी संघटना आणि विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले आंदोलन केलं. आज सुरु झालेले हे आंदोलन सर्वदूर पसरेल आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी होतील हा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
हैदराबादनंतर आता नागपूरच्या रस्त्यांवरही वेगळ्या राज्याच्या घोषणा घुमू लागल्या आहेत. तेलंगणापाठोपाठ वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही जेव्हा जेव्हा तेलंगणाचा मुद्दा पेटला तेव्हा विदर्भवादी वेगळ्या विदर्भासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळं विदर्भातले नेते वेगळ्या राज्यासाठी कितपत आग्रही आणि आक्रमक आहेत याबाबत नेहमीच शंका उपस्थित करण्यात येते. मात्र वेगळ्या राज्यासाठी आंदोलन हे परिमाण असू शकत नसल्य़ाचा सवाल विदर्भातले काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी उपस्थित केलाय. तर छोट्या राज्यांचे आपण सुरूवातीपासूनच समर्थक असल्याचं सांगत राष्ट्रवादीनंही विदर्भाला खुला पाठिंबा दिलाय.
शिवसेना सोडली तर राज्यातल्या सर्वच पक्षांनी वेगळ्या विदर्भाचा सूर आळवलाय. मात्र विदर्भातल्या काँग्रेस काही आमदारांनी अनुशेष दूर झाल्याशिवाय वेगळा विदर्भ नको अशी भूमिका घेतल्यानं काँग्रेसमध्येच दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
वेगळ्या विदर्भाची मागणी तशी तेलंगणापेक्षा जुनी आहे. मात्र विदर्भातल्या नेत्यांची स्वतंत्र राज्यासाठी कधीच आक्रमक भूमिका घेतली नाही. केवळ आंदोलन हे राज्य निर्मितीचे परिमाण नसले तरी राजकीय दबाव निर्माण करण्याचं महत्वाचं तंत्र आहे हे विसरून चालणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.