www.24taas.com, झी मीडिया, पुणे
खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.
दहा वर्षांचा कमलेश आणि पाच वर्षांची गौरी यांना जन्मतःच थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार जडलाय. यामुळे त्याच्या शरिरात रक्त तयार होण्याची प्रक्रीयाच होत नाहीये... खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलांना दर १५ दिवसांनी रक्त बदलण्यासाठी न्यावं लागतं. यासाठी महिन्याला सहा हजार रूपये इतका खर्च येतो.
मनमाडमध्ये १० बाय १०च्या रूममध्ये रहाणारं हातांगळे कुटुंब उसनवारीवर कसाबासा हा खर्च करतात.. अशा रुग्णांवर वेळीच शस्त्रक्रिया न झाल्यास असे रुग्ण केवळ पंधरा ते सोळा वर्षापर्यंतच जगु शकतात. अखेर पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात अशा शस्त्रक्रीया होतात हे कळताच दिगंबर यांनी पुण्याला धाव घेतली. सुदैवाने या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला रक्तगट त्यांचा धाकट्या बहिणीचा जुळल्याने तो प्रश्न सुटला. मात्र हि शस्त्रक्रिया आतिशय महागडी आहे.
दोन्ही मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना तब्बल १४ लाखांचा खर्च येणार आहे. हलाखीचे जीवन जगत असताना एवढी रक्कम आणायची कुटून हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. मुलंच्या उपचारासाठी त्यांनी अनेकदा सरकारी दप्तराच्या पाय-या झिजवल्या. मात्र लालफीतिच्या कारभारामुळे त्यांना लवकर मदत मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था पुढे आल्या तर या मुलांचे प्राण नक्की वाचतील.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या या चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी कमलेश हातांगळे याला ५४६६१३ या पेशंट नंबरवर तर गौरीला ५४६७१५ या पेशंट नंबरवर रोख अथवा धनादेश स्वरूपात मदत करा आणि या मुलांना जगण्याचा मुलभूत अधिकार मिळवून द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.