www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
कायदा करणारे आमदारच आता कायदा हाती घेऊ लागले आहेत. मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग अशी राडेबाजी लोकप्रतिनिधी म्हणवणा-या आमदारांनीच सुरू केलीय. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश आहे.
पिंपळगाव टोल नाक्यावरील महिलांना उद्देशून शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांनी अर्वाच्य शिवीगाळ केली. पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणा-या शिवसेनेचे हे शिवराळ आमदार. त्यांच्याविरूद्ध आता पोलीस ठाण्यात विनयभंग, शिवीगाळ, धमकावण्याचा गुन्हा दाखल झालाय. आ. अनिल कदम यांना पंधरा हजार रुपयांमध्ये जामिन मिळाला आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र ते कुटुंबवत्सल असल्याचं सर्टिफिकेट दिलंय.
आता संस्कृती जपण्याच्या गप्पा करणा-या शिवसेनेचे प्रमुखच अशा शिवराळ आमदारांना पाठीशी घालत असतील तर काय बोलायचे? या कुटुंबवत्सल अनिल कदमांनी यापूर्वी पीएला मारहाण झाल्यानंतर निफाड पोलीस ठाण्यातही असाच धिंगाणा घातला होता. ड्युटीवर हजर असलेल्या पोलीस अधिका-यांना त्यावेळीही त्यांनी धमकावले होते...
गेल्या काही महिन्यात आमदारांच्या राडेबाजीच्या घटना वाढतायत. गेल्या 19 मार्च रोजी विधान भवनाच्या आवारातच पाच आमदारांनी वाहतूक पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना कथित बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पाच आमदारांना निलंबित करण्यात आले. यथावकाश गेल्या पावसाळी अधिवेशनात त्या आमदारांचे निलंबन मागेही घेण्यात आले.
आमदारांनी केलेल्या मारहाण प्रकरणानंतर याबाबतची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे आमदार आर. एम. वाणी यांचाही समावेश होता. पण या वाणींनीच वैजापूर पाटबंधारे कार्यालयातील तीन अभियंत्यांच्या कानशीलात भडकवली होती. आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्या घटनेनंतर आमदारांची प्रतिक्रिया पाहिली, तर कुणालाही धक्का बसेल.
कायदा हातात घेतल्यानंतरही कुणी आपले काहीही बिघडवत नाही, अशी अरेरावीची भावना आमदारांमध्ये निर्माण झालीय. कल्याणचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी गेल्या 14 जून रोजी पालिका अधिका-यांना कार्यालयात कोंडून त्यांना मारहाण केली. तर गेल्या 4 ऑगस्टला सोलापूरचे काँग्रेस आमदार दिलीप माने यांनी पार्किंगच्या वादातून एका दुकानदाराला चोप दिला. त्यावेळी झालेल्या झटापटीत स्वतः आमदार दिलीप माने यांचाही हात फ्रॅक्चर झाला होता. बडने-याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तर कहरच केला. राणांनी गेल्या 14 ऑगस्ट रोजी अमरावतीचे उपमहापौर नंदकिशोर व-हाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
असे मारकुटे आमदार सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आहेत. मुजोरीची ही साथ सार्वजनिक स्वरूपाची असून, त्यावर ज्यांनी डोस द्यायचा, ते पक्षप्रमुखच आमदारांना पाठीशी घालत आहेत. रोगापेक्षा ही पाठराखण जास्त भयंकर आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.