www.24taas.com, जळगाव
एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.
जळगावच्या भूषण कॉलनी परिसरात अनिल भोळेंची खानावळ आहे. खानावळीतील शिळं अन्न फेकण्याऐवजी त्यापासून बायोगॅस तयार करुन त्याचा स्वयंपाकासाठी वापर करण्याची कल्पना भोळेंनी चार वर्षांपूर्वीपासून अंमलात आणलीय. रोजच्या शिळ्या अन्नाची स्लरी तयार करुन त्यासोबत 15 लिटर पाणी टाकीत टाकल्यानंतर त्यांना दिवसाला आठ तास पुरेल इतका मिथेन गॅस मिळू लागला. या गॅसपासून त्यांना खानावळीतील अन्न शिजवणं सुकर झालंय. तसंच त्यांना आता महिन्याला सहाऐवजी केवळ चार गॅस सिलिंडर लागतात. त्यामुळं वर्षाला हजारो रुपयांची बचत होते.
थोडा जादा वेळ लागत असला तरी या गॅसपासून दुहेरी फायदा मिळतोय. वापरात आणलेल्या स्लरीचा वापर सेंद्रीय खत म्हणूनही करता येतो. भारतासारख्या देशात अन्न-धान्याची मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी पाहता भोळेंचा हा प्रकल्प इतरांसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारा ठरलाय.