www.24taas.com, पुणे
पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली बनकर यांची निवड करण्यात आली आहे. वैशाली बनकर यांना ८२ मते मिळालीत. बनकर यांनी भाजपच्या उमेदवार वर्षा तापकीर यांचा पराभव केला.
वर्षा तापकीर यांना ४१ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २९ नगरसेवक तटस्थ राहिले. पुणे शहराला वैशाली बनकर यांच्या रुपाने ५२ वा महापौर मिळाला आहे. पुणे महापालिका अस्तित्वात येऊन ६२ वर्षे झाली. सलग दोन वेळा महापौर होण्याचा मान दि्वंगत बाबूराव सणस यांना मिळाला, तर सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा मान दत्तात्रेय गायकवाड यांना मिळाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के महिला आरक्षण लागू झाले. तसे महापौरपदालाही महिला आरक्षण लागू झाले. तेव्हा पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान कॉंग्रेसच्या कमल व्यवहारे यांना मिळाला. त्यानंतर सलग तीन महिला महापौर झाल्या; परंतु त्यांना काम करण्यास एक वर्षाचा कालावधी मिळाला. त्यानंतर मात्र दीप्ती चौधरी, रजनी त्रिभूवन आणि राजलक्ष्मी भोसले यांना अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. आता वैशाली बनकर या महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसने सव्वा-सव्वा वर्षासाठी पद देण्याचा निर्णय घेतला आहे.