www.24taas.com, कराड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेजबाबदार वक्तव्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाची खिल्ली राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उडविली. त्याचबरोबर जोरदार चिमटाही काढला.
आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती. मला कुणाचं नाव घेऊन कुणाला मोठं करायचं नाही. लोक आपल्याला मतं देऊन मोठं करतात, तेव्हा त्यांच्याशी बोलताना विचार करायला हवा, असा टोला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना लगावला.
अजित पवार यांनी रविवारी कराडच्या प्रीतिसंगामवरील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर नतमस्क होऊन आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. मात्र या उपोषणावर विरोधकांनी टीका करत, आत्मक्लेष नको, राजीनामा द्या, अशी मागणी लावून धरली आहे. तसंच हा आत्मक्लेष म्हणजे नौटंकी असल्याची टीका, विरोधकांनी केली.
दरम्यान, अजित पवारांच्या या आत्मक्लेशाबाबत थेट प्रतिक्रिया देणं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाळलंय. राजकारणात प्रत्येकालाच आत्मचिंतन करण्याची गरज असते, पण सगळ्यांनाच तितका वेळ मिळत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवारांना खरोखर आत्मक्लेश झालाय की नौटंकी आहे, या प्रश्नावर उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं.