www.24taas.com, पुणे
पुणे महापालिका शिक्षण मंडळाने आणखी एक वाद निर्माण केला आहे. हा वाद आहे विद्यार्थ्यांच्या सहलीचा. शिक्षण मंडळाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सहलींमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सुराज्य संघर्ष समितीने केला आहे. सव्वादोन कोटी रूपयांच्या खर्चावरून झालेल्या या आरोपांच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
गेली तीन वर्ष पुणे शिक्षण मंडळाच्या शाळांची ट्रिप गेली नव्हती. यावर्षी ती गेली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. मुलांसाठी खरेदी केल्या जाणा-या शालोपयोगी साहित्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहाराचे आरोप यापूर्वी झाले आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांच्या सहलींमध्येही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत.
पालिकेच्या शाळांमधल्या ८० हजार विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करतांना मंडळाने अनेक गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिका-यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. जवळपास सव्वादोन कोटी रूपये या सहलींवर उधळतांना निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली नाही, तसंच विद्यार्थ्यांच्या आनंदाचा विचारही केला गेला नाही असा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला. इतकंच नाही तर ज्या ठेकेदारांना सहली आयोजित करण्याचं काम मिळालं ते देखील पदाधिकाऱ्यांच्या संबंधातील आहेत. पण शिक्षण मंडळ अध्यक्ष मात्र असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगताहेत.
याशिवाय जो दोन कोटी सव्वीस लाख रूपये असा खर्च झालाय तोही फुगवला गेल्याचा आरोप आहे. यात हॉटेल चालकांचाच फायदा झाल्याचं दिसतंय. इतकंच नव्हे तर तीन हजार विद्यार्थी एकाच वेळेस एका वॉटर पार्कमध्ये मावलेच कसे हाही प्रश्न विचारला जातोय.