www.24taas.com, पुणे
महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र झालंय. त्याचं सत्ताकेंद्र पुण्यातलं बारामती आहे अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केलीय. पुण्यात १० व्या पुलोत्सवात त्यांनी हा हल्लाबोल केलाय.
वाइन म्हणजे फळांचा रस आहे, असा प्रचार होतो. किंगफिशरबरोबर जॉइंट व्हेंचर केले जाते अन् या सर्व गोष्टींना बारामतीतून पाठबळ मिळते, असा आरोप डॉ. बंग यांनी केला. `पुलोत्सवा ` च्या उद्घाटन समारंभात` सामाजिक कृतज्ञता पुरस्कार` स्वीकारताना ते बोलत होते.
`मद्यनिर्मिती झाली, की त्याचे `मार्केट` शोधले जाणारच. त्यामुळे राज्याला दारूतून आठ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. ३० हजार कोटी रुपयांच्या दारूचा खप राज्यात होतो. म्हणूनच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आह, असे डॉ. बंग यांनी म्हटले आहे.
देशाचे सरासरी वय सध्या २६ वर्षे आहे; परंतु रेव्ह पार्टी , चिल्लर पार्टी यासारख्या पुण्याजवळ घडणाऱ्या गोष्टी पाहिल्या , की युवकांना सांभाळण्याची जबाबदारी मोठी असल्याची जाणीव होते. पुणे विद्यापीठात `वाइन टेक्नॉलॉजी` वर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ऐकले. यॉर्कसारखे शहर `टोबॅको फ्री` होऊ शकते, तर जागरूक पुण्यातून `मद्यमुक्त पुणे` या क्रांतीची सुरुवात व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.