www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिका फायर ब्रिगेड जवानांसाठी हेल्मेट खरेदी करणार आहे. फायर ब्रिगेडच्या जवानंसाठीचे हेल्मेट म्हटल्यावर ते वेगळे असणार आणि त्याची किंमत देखील जास्त असणार हे आलेच. मात्र एक हेल्मेट तीस हजार रुपयांना असेल तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पुणे महापालिका अशा हेल्मेटची खरेदी करतेय
पुणे महापालिका फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी हेल्मेट खरेदी करतेय. या एका हेल्मेटची किंमत आहे तब्बल तीस हजार आणि अशी तीनशे हेल्मेट महापालिका खरेदी करणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे केली जाणारी ही हेल्मेट खरेदी एखाद्या वेळी समजू शकते, पण सुरक्षा फक्त काही डोक्यावरच्या हेल्मेटमुळे होणार नाही. त्यासाठी जवानांच्या पायात चांगले गम बूट हवेत. त्याचबरोबर अंगावर फायर सूटही हवा. साधा गणवेशही या जवानांना गेल्या कित्येक वर्षांत मिळालेला नाही. फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेनं २०१० मध्ये निविदा काढली. आता २०१३ संपत आलं तरी, या निविदेमधला वस्तूंचा पुरवठा संबंधित ठेकेदार अजूनही पूर्ण करू शकलेला नाही. त्याआधी म्हणजे २०१० च्या आधी चार वर्ष फायर ब्रिगेडसाठी अशी खरेदी झालीच नव्हती... आणि ही सर्व वस्तुस्थिती खुद्द महापालिकेचे अधिकारीच सांगतायत..
हेल्मेट खरेदीतली धक्कादायक माहिती तर वेगळीच आहे. एवढ्या महागड्या हेल्मेटची मागणी फायर ब्रिगेडनं केलेलीच नाही. फायर ब्रिगेडने मागणी केली होती ती, मुंबई फायर ब्रिगेड वापरत असलेल्या सिकंदर हेल्मेटची. त्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा मागवली होती. त्यात साडे सातशे रुपयांना हेल्मेट देण्याची निविदाही आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यानंतर हा तीस हजार रुपयांच्या हेल्मेटचा घाट घालण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी महापालिकेचा मध्यवर्ती खरेदी विभाग ही हेल्मेट खरेदी करत नाही तर, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत खरेदीचा घाट घातला गेलाय.
फायर ब्रिगेडचे जवान गेल्या वीस वर्षांपासून ही हेल्मेट वापरतायत. या कालावधीत कुठल्याही दुर्घटनेत आताची हेल्मेट कुचकामी ठरलेली नाहीत. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अंगावर कपडे नसताना, जॅकेट नसताना डोक्यावर तीस हजारांचा मुकुट चढवण्याची हौस कशाला..... त्यामुळे पुणे महापालिकेचं डोकं ठिकाणावर आहे काय, असाच प्रश्न उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.