www.24taas.com कोल्हापूर
श्रीमंत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळ निवारणासाठी केवळ 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीचं आवाहन केल्यानंतर अनेक देवस्थानांनी उत्स्फुर्तपणे कोट्यवधींचा निधी दुष्काळ निवारणासाठी दिलाय. मात्र कोल्हापुरातल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केवळ 11 लाखांची मदत जाहीर केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे वार्षिक उत्पन्न 10 कोटी 50 लाख इतकं आहे. तर 46 कोटी रुपयांच्या रोख ठेवी आहेत. मात्र इतक्या श्रीमंत देवस्थान समितीनं इतकी कमी रक्कम मदत निधीसाठी जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरांच्या सुविधांबाबतही फारसे गांभीर्याने काम केलेले नाही.
आजही महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांसाठी पुरेशा सुविधा नाहीत, त्याचबरोबर भाविकांना भर उन्हात दर्शन रांगेत उभे राहावे लागते. अशा मूलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष करणा-या देवस्थान समितीने दुष्काळ ग्रस्तांसाठी तरी सढळ हाताने मदत करायला हवी होती अशा भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.