रोड रोमिओ: आमदारांनी धरले, पोलिसांनी सोडले

रोड रोमिओंना पकडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बापू पठारे यांनी त्यांना या विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात रोड रोमिओंना दिल्यानंतर आमदारांचे काम संपले आणि पोलिसांचे सुरु झाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2013, 10:50 PM IST

www.24taas.com, पुणे
भर रस्त्यात विवाहितेची छेड काढणा-या रोड रोमिओंना आमदारानं पाठलाग करून पकडलं. त्यानंतर या रोड रोमिओंना पोलिसांच्या हवाली देखील केलं. ही घटना घडली पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात. आमदारांनी रोड रोमिओंना असा झटका दिला खरा. मात्र, दुस-या दिवशी पोलिसांकडून याच्याविरुध्द अनुभव मिळाला.
रोड रोमिओंना पकडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बापू पठारे यांनी त्यांना या विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात रोड रोमिओंना दिल्यानंतर आमदारांचे काम संपले आणि पोलिसांचे सुरु झाले. सोमवारी मात्र या विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील चित्र वेगळेच होते. भररस्त्यात विवाहितेची छेड काढणारे रोड रोमिओ पोलिस ठाण्यात नव्हतेच. त्याहून कमाल म्हणजे या रोड रोमिओंचे पुढे काय झालं हे सांगायला पोलिसच हजर नव्हते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजेवर. ज्यांच्याकडे पोलिस ठाण्याचा चार्ज आहे ते गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कुठल्यातरी मिटींगला गेलेले. ते कुठल्या मिटींगला आणि कोठे गेले आहेत हे सांगायला देखील ना पोलिस उपनिरीक्षक होते ना ठाणे अंमलदार. त्यामुळे आमदार पठारे यांनी केलेली सारी मेहनत पाण्यातच गेली.
पोलीस जर उपस्थित नसतील तर आमदारांनी पकडून दिलेल्या रोड रोमिओ पोलिस स्टेशनमध्ये थोडेच असणार आणि तसे ते नव्हतेही. त्यामुळे लोकप्रतिनिधीने पाठलाग करून पकडून दिलेल्या या आरोपींचे काय झाले असेल हे वेगळे सांगायला नको. ही घटना घडली तो परिसर आमदार पठारेंच्याच मतदार संघात येतो. या कामगिरीमुळे आमदार बापू पठारे यांची मात्र त्यांच्या मतदार संघात कौतुक होतंय.