www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी
पिंपरीत सोनसाखळी चोरांचा धुडगूस सुरू असल्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘स्पेशल ४२’ या तपास पथकानं पाच सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे ४२ गुन्हे उघडकीस आले असून, ६० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
नीलेश संजय सस्ते (वय २०, ज्योतिबानगर, काळेवाडी), प्रशांत पवनसिंग ठाकूर (वय १९, तापकीरनगर, काळेवाडी), मुजम्मील ऊर्फ मुन्ना जाकीर अन्सारी (वय २०, ज्योतिबानगर, काळेवाडी), राहुल बाबुराव गवळी (वय २४, वेताळनगर, चिंचवड), अशोक शंकर मटके (वय २०, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आणखी तीन आरोपी फरार आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या करिझ्मा, पल्सर गाड्या तसंच ६० तोळे सोनं पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप आणि सहायक आयुक्त शिवाजी शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
आरोपींकडून सोनं खरेदी करणाऱ्या सराफांनाही ताब्यात घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेले ४२ जणांचे `स्पेशल ४२` हे पथक निर्माण करण्यात आलंय.
सोनसाखळी चोरांचं लक्ष्य म्हणजे अंगावर दागिने घालून बाहेर पडणाऱ्या महिला होत्या. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं थांबवून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून उलट्या दिशेनं पळून जाण्याची आरोपींची पद्धत होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.