www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.
नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली आज या तरुणांची गाडी सापडली. क्रेनच्या सहाय्यानं ही गाडीवर काढण्यात आली. स्थानिक मच्छिमार आणि एनडीआरएफचे जवान ही शोध मोहीम करत होते. त्यांच्या शोध मोहिमेला यश मिळालं. मात्र चार तरुणांच्या घरावर आभाळ कोसळलंय.
प्रणव लेले, चिंतन बुच, साहिल कुरेशी आणि श्रृतिका चंदवाणी अशी या चौघांची नावं आहेत. श्रृतिका ही मूळची कोल्हापूरची असून तिला कोल्हापुरात सोडून तीन मित्र कर्नाटकातील गोकर्णला जाणार होते. पुण्यातल्या एका जाहिरात कंपनीत हे चौघंही काम करत होते. दिवाळीची सुट्टी असल्यानं त्यांनी देवदर्शनाचा त्यांनी प्लान केला होता. मात्र पाच दिवसांनंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
काल या चार मित्रांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळून आला होता. त्यानंतर इतर तिघांचा शोध सुरू होता. आज सकाळी गाडीचा शोध लागला आणि गाडीतच तिघांचे मृतदेह सापडले.
गाडीचा अपघातच झाला असल्याचा अंदाज आता पोलिसांनी वर्तवलाय. मात्र हा अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.