www.24taas.com, कराड
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीतीसंगमावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
दुष्काळकरांची थट्टा करणाऱ्या अजित पवार यांच्या आत्मक्लेष उपोषणाचा निषेध म्हणून शिवसेना-भाजप आणि मनसेनेही कराडमध्ये `गोमूत्र प्रयोग` केला ‘पाणीच नाही तर धरणात मुतायचे काय?’, या अजित पवारांवरच्या बेताल वक्तव्यावरून उठलेले वादळ शांत होण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणी तीनदा माफी मागूनही टीका सुरूच राहिल्याने अजित पवार यांनी रविवारी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन आत्मक्लेष उपोषण केले.
विरोधी पक्षांचे नेते अजितदादांच्या राजीनाम्यावर ठाम असून त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची आंदोलने सुरूच आहेत. आज सकाळीही कराड येथे काही कार्यकर्त्यांनी गोमूत्र आंदोलन केले. यशवंतरावांचे समाधीस्थळ ही पवित्र जागा आहे. त्या ठिकाणी उपोषणाला बसून अजित पवारांनी हे स्थळ अपवित्र केले आहे, असे सांगत विरोधकांनी हे आंदोलन केले.