www.24taas.com, झी मीडिया, पुणे
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर तळेगावजवळ ‘दीपा’ या डान्स बारवर काल रात्री छापा टाकण्यात आला. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी १० बारबालांनासह काही ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आलंय. छाप्यात सात लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आलीय. रात्री साडे अकाराच्या सुमारास सुरु झालेली छाप्याची कारवाई पहाटेपर्यंत चालू होती.
सतीश पुजारी, विनोद गिडवानी आणि त्यांचा आणखी एक सहकारी हा डान्स बार चालवत होते. यापैकी पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईतली महत्त्वाची बाब म्हणजे, `वडगाव मावळ` या स्थनिक पोलीस स्टेशनाला पूर्णपणे अंधारात ठेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे, वडगाव-मावळ पोलिसांच्या आशीर्वादानंच हा डान्स बार सुरु होता का? अशी शंकाही उपस्थित केली जातेय.
राज्यात डान्स बारवर बंदी आहे. ज्या भागात डान्सबार आढळून येईल, तिथले पोलीस निरीक्षक आणि विभागाचे पोलीस उपायुक्त अथवा उपाधीक्षकांवर कारवाईची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. असं असतानाही पुण्यात राजरोसपणे हा डान्सबार सुरु असल्याचं स्पष्ट झालंय. आता वडगाव-मावळच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असं बिरूद मिरवणाऱ्या पुण्याची संस्कृती गेल्या काही वर्षांपासून ढासळत असल्याचं वारंवार समोर येतंय. अंमली पदार्थ, दारू यांची रेलचेल असलेल्या रेव्ह पार्ट्या इथं चालतात. शाळकरी मुलांच्या चिल्लर पार्ट्यांमध्ये दारूचा पूर येतो. इथं डान्सबारची छमछमही सुरू असल्याचं आता समोर आलंय. यामुळे पुण्याची संस्कृती नेमकी कोणत्या दिशेनं जातेय? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.