www.24taas.com, पुणे
पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभर ४० शाखा असलेल्या रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक निर्बंध लादल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय.
पुढील ६ महिन्यांपर्यंत हे निर्बंध लादण्यात आलेत. त्यामुळं ग्राहकांना दिवसाला एक हजार रूपयेच खात्यातून काढता येणार आहेत. तसंच अन्य कोणतेही व्यवहार बँकेला करता येणार नाहीत. बँकेत १४०० कोटींच्या ठेवी असून ८०० कोटींचे कर्जवाटप केलंय.
२००२ सालापूर्वीच्या कर्जप्रकरणांची कोट्यावधींची वसुली बँकेला करता न आल्यानं हे निर्बंध लादण्यात आलेत. काही वर्षांपासूनच आरबीआयनं काही बंधने या बैंकेवर घातली आहेत. त्यानुसार कोणतीही कर्जप्रकरणे वा व्यवसाय या बैंकेला करता येत नव्हता. पण या बंधनांचा सर्वसामान्य ग्राहकाच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होत नव्हता.
आता आरबीआयनं कठोर निर्बंध लादल्यानं ठेवीदारांना हवे तेवढे पैसे मिळणं दुपारी बंद झाल्यानं शेकडो ठेवीदारांच्या रांगा लागल्या. राज्यभर सुमारे ७ लाख ग्राहक या रूपी बैंकेचे आहेत.
बैंकेने मात्र आपली आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं सांगत ठेवीदारांच्या ठेवींना कोणताही धोका नसल्याचं सांगितलं.. येत्या सोमवारी आरबीआयबरोबर बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.