www.24taas.com,सांगली
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.
राज्य दुष्काळात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही विवाह सोहळे आयोजित केल्यामुळं पक्षाध्यक्ष शरद पवारांची तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे या मुद्यावर त्यांची झोप उडालेली असतानाही राष्ट्रवादीचे नेते त्यांचं ऐकायला तयारी नाहीत.
पवारांचा आदेश धाब्यावर बसवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा मोठ्या शाही थाटात पार पाडला.
या विवाह सोहळ्यात तब्बल २७०० किलो मटनाचे शाही महाभोजन देण्यात आले. तसंच 35 ते चाळीस हजारांच्या पंगती उठल्या आणि तेवढ्याच बिसलरीच्या बाटल्याही रिकाम्या करण्यात आल्या. या विवाह सोहळ्याला लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा टीकेचं लक्ष्य बनलीय.