www.24taas.com, यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)
चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.
खरंतर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावण्याची परंपरा आहे. मात्र यंदा दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर राहणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. तर कोकणचे नेते म्हणून ज्यांची ओळख सांगितली जाते ते नारायण राणे यांनीही दांडी मारली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत समारोप झाला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी या दोघांनीही समारोपाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. हा पूर्वनियोजित कार्यक्रम असूनही प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं एवढ्या वर्षांची परंपरा खंडीत झालीये. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये नाराजी होती.
परशुराम यांच्या परशुवरून वादात सापडलेले आणि व्यासपीठाला ठाकरे यांचे नाव देण्यावरून आधीच वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाचा समारोपही नेत्यांच्या अनुपस्थितीत पार पडणार आहे.
दरम्यान, तीन दिवस चाललेल्या या संमेलनात साहित्य प्रेमींना आपल्या लाडक्या साहित्यिकांच्या सहवासात राहता आलं. अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद तसंच कविसंमेलनांची रेलचेल या संमेलनात होती.