मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.

Updated: May 23, 2017, 04:33 PM IST
मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट title=

मॅन्चेस्टर : ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर सावट पसरलं आहे. बीसीसीआयनं आयसीसीला पत्र लिहीलं आहे. या पत्रात भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत ४ जूनला पाकिस्तानविरुद्ध पहिली मॅच खेळणार आहे. एजबॅस्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

मॅचेस्टर शहरात असलेल्या प्रसिद्ध मॅनचेस्टर अरिनामध्ये अमेरिकन पॉप गायिका एरियाना ग्रँडची लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होती. यावेळी अचानक भला मोठा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.

हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याच्या दृष्टीनं पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये अनेक लोक रक्तानं माखलेल्या अवस्थेत अरिनामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहेत. स्फोटानंतर संपूर्ण घटनास्थळ रिकामं करण्यात आलं.

प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, कॉन्सर्टच्या शेवटी शेवटी हा स्फोट झाला. कॉन्सर्टसाठी उभारण्यात आलेल्या तिकीट खिडक्यांजवळच हा स्फोट झाल्यानं जीवितहानी वाढली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटीश पोलिसांनी घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन बाहेर गावी जाणाऱ्या सगळ्या रेल्वेगाड्या तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.