मुंबई : 1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनासाठी आयसीसी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 135 मिलीयन युएस डॉलर देणार आहे. एवढे पैसे देण्याच्या आयसीसीच्या या निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झाल्याचं समजतंय.
इंग्लंडला 135 मिलीयन युएस डॉलर देण्यात येणार आहेत, पण भारतात 8 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान झालेल्या टी20 वर्ल्ड कपवेळी आयसीसीनं बीसीसीआयला फक्त 45 मिलीयन युएस डॉलर दिले होते. यामुळे बीसीसीआय नाराज आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 दिवस चालणार असून यामध्ये 15 मॅचचा समावेश आहे, पण भारतात झालेला टी20 वर्ल्ड कप 27 दिवस चालला यामध्ये पुरुषांच्या 35 आणि महिलांच्या 23 अशा एकूण 58 मॅच झाल्या. यावर बीसीसीआयनं आक्षेप घेतला आहे.
बजेटमध्ये देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये आयसीसी लंडनमध्ये एक इमारत बांधणार आहे, आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर ही इमारत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला देण्यात येणार असल्याचंही समजतंय. 6 आणि 7 सप्टेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय हा मुद्दा उचलणार असल्याची माहिती आहे.