चेन्नई : भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर 284/4 एवढा झाला आहे. दिवसाच्या शेवटी मोईन अली नाबाद 120 रनवर तर बेन स्टोक्स नाबाद पाच रनवर खेळत आहे.
या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन अलिस्टर कूकनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण स्कोअरबोर्डवर सात रन असताना पहिला तर 21 रनवर दुसरा धक्का बसला. यानंतर मात्र जो रुट आणि मोईन अलीनं इंग्लंडच्या डावाला आकार दिला. जो रुट 88 रनवर आऊट झाल्यानंतर मोईन अलीनं पुन्हा एकदा बेअरस्टोच्या मदतीनं इंग्लंडला सावरलं. पण 49 रनवर असताना बेअरस्टो जडेजाचा शिकार झाला.
भारताकडून रविंद्र जडेजानं सर्वाधिक तीन तर इशांत शर्मानं एक विकेट घेतली. मागच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावणारा जयंत यादव आणि भुवनेश्वर कुमारला या मॅचमध्ये संधी मिळाली नाही. जयंत यादवऐवजी टीममध्ये लेग स्पिनर अमित मिश्राला तर भुवनेश्वरऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे.