मीरपूर: बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय टीमवर बांग्लादेशविरुद्ध पहिलीच वन-डे मालिका गमाविण्याचं संकट निर्माण झालंय. या व्यतिरिक्त पहिल्या मॅचमध्ये रन घेण्याच्या प्रयत्नात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन धोनीला ७५ टक्के सामना शुल्क गमवावं लागलं. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताचा मार्ग खडतर आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून बांग्लादेश सातत्यानं चांगली कामगिरी करीत आहे.
आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत अंतिम आठ संघात स्थान मिळविल्यानंतर मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश संघानं मायदेशात पाकिस्तानचा वन-डे मालिकेत ३-० नं पराभव केला.
बांग्लादेशनं त्यानंतर पहिल्या वन-डे लढतीत भारतासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करीत प्रतिभा असल्याचं सिद्ध केलंय. त्यामुळं आजची मॅच टीम इंडियासाठी करो या मरोची मॅच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.